मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा असं अजित पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरती भेट होईल त्यावेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार म्हणाले. तसेच अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही असंही रोहित पवार म्हणाले.
अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला असं रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या.
काकी, तुमच्या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी मी तयार असेन असं आश्वासनही रोहित पवारांनी दिलं.
रोहित पवार पुढे म्हणाले की, “एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
