आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद
मुंबई : चौथ्या आरंभ स्पोर्ट्स तर्फे  आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पार्थ धारोड, सनया पवार या समता क्रीडा भवनच्या दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे पुरुष, महिला गटात सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद विद्यामंदिर, दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले, तर महिला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद समता क्रीडा भवन यांनी पटकावले. ही स्पर्धा मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराच्या उत्कृष्टतेचा व शिस्तीचा गौरव करणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *