भाजपाच्या करवाढी विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन-अरविंद जोशी
मीरारोड – विधिमंडळात विरोधकांचा जोमाने एकत्रित मुकाबला करणारे सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना रस्त्यावर मात्र एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. मीरा भाईंदरमध्ये तर भाजपाने केलेल्या अन्याय करवाढीविरोधात शिंदेसेनेने रस्त्यावर उतरून भाजपाविरोधात भीकमांगो आंदोलन केले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने पहिल्याच महासभेत नागरिकांवर मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात तब्बल ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. त्या निषेधार्थ शिंदेसेनेने महापालिकेत भाजपा विरोधात भीक मागो आंदोलन केले. मुख्यालयात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालना बाहेर ठिय्या मारला तसेच आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली.
पहिल्याच महासभेत सत्ताधारी भाजपाने भाड्यावरील मालमत्ताच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेतलाच शिवाय मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. कर योग्य मूल्य दरात वाढ केल्याने मालमत्ता कर मध्ये मोठी वाढ होणार आहेच शिवाय रस्ता कर, पाणी पुरवठा लाभकर, मलप्रवाह सुविधा कर, वृक्ष कर, शिक्षण कर, अग्निशमन कर देखील वाढणार आहेत. ह्या कर वाढी वरून टीकेची झोड सुरु आहे. याविरोधात पालिका मुख्यालया बाहेर शिवसैनिकांनी भीक मागत भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक हे मुख्यालयात शिरले. दुसऱ्या मजल्यावर भाजपा महापौर डिम्पल मेहता यांच्या दालना बाहेर ठिय्या मारत करवाढ रद्द करण्याची मागणी केली.
शिंदेसेनेच्या नगरसेविका वंदना पाटील, शर्मिला बगाजी, फ्रिडा डिमेलो, जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हा संघटक निशा नार्वेकर सह माजी नगरसेवक प्रवीण पाटील व तारा घरत, पदाधिकारी सचिन मांजरेकर, विक्रमप्रताप सिंह, प्रसाद सुर्वे, विकास पाटील आदींनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना निवेदन दिले. विषयपत्रिकेवर विषय नसताना बेकायदा ठराव केला असून करवाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
भाजपाचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी आदीं कडून हि वाढ नागरिकांवर केलेली नाही तर १ एप्रिल नंतर कर आकारणी होणाऱ्या घर – दुकाने आदी मालमत्तां वर लागणार आहे असे सांगत आहेत. मात्र हि नागरिकांची दिशाभूल व खोटेपणा असल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे.
भाजपा के नाम से दे दे बाबा…. मीरा भाईंदरमध्ये नागरिकांवर लादण्यात आलेल्या अन्याय करवाढीविरोधात एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून भाजपा के नाम से दे दे बाबा अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.
