आजच्या पिढीसाठी सावरकरांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे जातिभेदाचे समूळ उच्चाटन. केवळ बाह्य व्यवहार बदलून चालणार नाही. मनात रुतलेली जात नष्ट करावी लागेल, असे ते म्हणत. व्यवसाय आणि रोटी-बेटी व्यवहारातील बंधने तुटली, तरी मानसिक गुलामगिरी उरली तर खरी प्रगती होणार नाही. स्वतंत्र विचार करणारी, अंधश्रद्धा झटकून टाकणारी नव्या युगाची पिढी हीच त्यांच्या स्वप्नातील समाजक्रांतीची आशा आहे.
इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचे मूल्यमापन करताना दोन टोकांपासून जपून रहावे लागते. अतिभक्ती आणि अतिरेकी टीका. कारण या दोन्ही टोकांमध्ये सत्य अनेकदा हरवते. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याभोवती प्रशंसा आणि विवाद यांचे वलय आजही तितक्याच तीव्रतेने फिरताना दिसते. 26 फेब्रुवारी रोजी 144 वी जयंती साजरी करत असताना त्यांच्याकडे केवळ भावनांच्या किंवा राजकीय पूर्वग्रहांच्या चष्म्यातून पाहण्याऐवजी इतिहासाच्या संदर्भात त्यांच्या लेखनाच्या आणि कृतीच्या आधारे चिकित्सक नजरेने पाहणे अधिक आवश्यक ठरते. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक नव्हते. ते समाजरचनाविषयक चिंतक, तर्कनिष्ठ सुधारक आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना मांडणारे विचारवंत होते. त्यांच्या जीवनातील अंदमानातील कठोर शिक्षा, रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ, जातीनिर्मूलनासाठी केलेले प्रयोग आणि अखंड राष्ट्राच्या संकल्पनेविषयीची त्यांची तळमळ या सर्वांचा एकत्रित विचार केल्याशिवाय त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजणे कठीण आहे.
सावरकरांच्या दृष्टीने ‘धर्म’ ही संकल्पना संकुचित नव्हती. हिंदू मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा पंथनिहाय विभागणीत ते धर्म पाहत नसत. ‘धारयति इति धर्म:’ ही व्याख्या इरावती कर्वे यांनी मांडली आहे. म्हणजे धारण केला जातो आणि समाजाला एकत्र बांधतो तो धर्म असे त्या म्हणतात. सावरकरांचा दृष्टिकोन याच संकल्पनेशी साधर्म्य राखतो. त्यांच्या मते, या भूमीत राहणारा प्रत्येकजण सांस्कृतिक अर्थाने ‘हिंदू’ आहे. ‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही पंथाचा द्योतक नसून सिंधू संस्कृतीपासून अपभ्रंश होत निर्माण झालेली एक भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व’ हे त्यांच्यासाठी धर्मसंकल्पना नसून सांस्कृतिक राष्ट्रत्वाचे प्रतिक होते. अंदमानमधील सेल्युलर तुरुंगातून झालेल्या त्यांच्या सुटकेविषयी समाजात आजही वाद आहेत. सावरकरांनी शंभरहून अधिक अर्ज लिहिले, माफी मागितली अशी टीका वारंवार होते. परंतु या घटनांकडे केवळ भावनिक नजरेतून पाहणे इतिहासाला न्याय देणारे नाही. कारण त्यांनी ‘राजकारणापासून अलिप्त राहीन’ अशी कबुली दिल्यानंतरच त्यांची सुटका झाली. अर्थात ते पूर्ण स्वातंत्र्य नव्हते, तर रत्नागिरीतील स्थानबद्धता होती. आयुष्यभर तुरुंगात खितपत पडून काही साध्य होणार नाही, हे त्यांना उमगले होते. दोन पावले मागे येऊन चार पावले पुढे जाण्याची ही नीती होती. देशासाठी कार्य करण्याचे मार्ग केवळ राजकारणापुरते मर्यादित नसतात, तर समाजकारणही तेवढेच प्रभावी असावे लागते, हा त्यांचा विश्वास होता.
1924 मध्ये सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. राजकीय कार्यावर निर्बंध होते. सार्वजनिक राजकीय भाषणांवर मर्यादा होत्या. परंतु या बंधनांमधूनही त्यांनी राष्ट्रनिर्मितीचा मार्ग शोधला आणि तो मार्ग होता समाजसुधारणेचा. रत्नागिरीत त्यांनी सर्वप्रथम हात घातला तो जातिभेदाच्या प्रश्नाला. जन्मावर आधारित उच्च-नीचतेची भावना हा राष्ट्रशक्तीचा क्षय करणारा घटक आहे असे मत ते ठामपणे मांडत. म्हणूनच त्यांनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली. दलित वस्त्यांमध्ये जाऊन सहभोजन करणे, त्यांना आपल्या घरी आमंत्रित करणे, आपल्या घरात-अगदी स्वयंपाकघरातही प्रवेश देणे, सार्वजनिक विहिरी, मंदिरे आणि सामाजिक स्थळे सर्वांसाठी खुली व्हावीत यासाठी प्रचार करणे या कृती त्या काळात धाडसी मानल्या जात. जन्म, व्यवसाय, रोटी-बेटी व्यवहार आणि परंपरा या चार स्तंभांवर उभी असलेली जातिव्यवस्था नष्ट व्हावी हा त्यांचा ध्यास होता. त्या काळातील सामाजिक परिस्थितीत ही कृती क्रांतिकारीच होती. त्यामुळे त्यांना केवळ परंपरावाद्यांकडून नव्हे, तर स्वतःच्या समाजातूनही विरोध पत्करावा लागला.
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण सुसंगती दिसते. ते जसे बोलत तसेच जगत. विचार आणि आचरण यांच्यातील दरी त्यांनी जाणीवपूर्वक नाकारली होती. त्यांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ हा याच सुसंगतीचा प्रत्यय देणारा ठरतो. सावरकर केवळ दलित समाजाबरोबरच नव्हे, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांबरोबरही सहभोजन करत. त्या काळात सहभोजन हा सामाजिक क्रांतीचा प्रत्यक्ष प्रयोग होता. मांडीला मांडी लावून बसणे, एकत्र बसून जेवणे या कृती म्हणजे त्या समाजमान्यतेच्या भिंतींना दिलेले उघड आव्हान होते. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या, पंथभेदांच्या कोंडमाऱ्यात अडकलेल्या समाजाच्या दृष्टीने हे पाऊल धाडसीच नव्हे, तर परंपरावाद्यांना अस्वस्थ करणारे होते.
या कृतीमुळे पारंपरिक रूढी आणि रिवाजांना घट्ट धरून बसणाऱ्या भारतीय समाजात खळबळ उडालीच, परंतु काही मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांमध्येही एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती, असेही म्हटले जाई. कारण त्या काळात ‘सहभोजन’ धार्मिक सीमारेषांशी जोडले गेले होते. रत्नागिरीतील सहभोजनांच्या पंक्ती केवळ जेवणाच्या नव्हत्या. त्या सामाजिक क्रांतीच्या पंक्ती होत्या. त्या पंक्तीत बसताना सावरकर केवळ समाजसुधारकाची भूमिका बजावत नव्हते, तर ‘मानव’ या समान ओळखीचा पुरस्कार करत होते. राष्ट्र उभे राहते ते समानतेच्या पायावर यावर त्यांचा ठाम विश्वास होता. अन्न, पाणी आणि स्पर्श यांच्या भिंती पाडल्याशिवाय मनाची दारे उघडत नाहीत हे त्यांना ठाऊक होते.
रत्नागिरीतील पतितपावन मंदिर ही त्यांच्या सामाजिक क्रांतीची साक्ष देणारी घटना ठरली. सर्व हिंदूंसाठी जातीभेदाशिवाय प्रवेश असलेले मंदिर उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक समानतेचे प्रतीक असावे, हा त्यामागचा संदेश होता. या उपक्रमामुळे त्यांना पारंपरिक समाजरचनेतील घटकांकडून विरोधही सहन करावा लागला. कर्मकांड, अंधश्रद्धा, स्पृश्य-अस्पृश्यता, सोवळे-ओवळे यासारख्या प्रथांना त्यांनी उघडपणे विरोध केला. बुद्धिनिष्ठ, विज्ञानाभिमुख आणि पुरोगामी दृष्टीकोन हा त्यांच्या विचारांचा पाया होता. बुद्धीला न पटणारी आणि तर्कसंगती नसणारी कोणतीही गोष्ट अथवा कृती केवळ पूर्वीपासून चालत आली आहे, म्हणून आचरणात आणू नये असा त्यांचा आग्रह होता. अखंड हिंदुस्थान हे त्यांचे स्वप्न होते. फाळणीच्या प्रश्नावर त्यांची भूमिका ठाम होती. भारत अखंड राहावा ही त्यांची इच्छा होती. देशाचे विभाजन ही एक ऐतिहासिक शोकांतिका आहे असे ते मानत. सावरकरांच्या विचारांशी मतभेद व्यक्त केले गेले. त्यांच्या कृतींवर टीकाही झाली. परंतु त्या टीकेमुळेच त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास झाला. त्यांच्या साहित्याचा पुनर्विचार झाला आणि त्यांच्या कार्याचे अनेक पैलू नव्याने उजेडात आले. किंबहुना, त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळेच सावरकर पुन्हा एकदा ‘जीवित’ झाले असे म्हणता येईल. असे भाग्य इतर कुणाही स्वातंत्र्यसेवकाला लाभले नाही.
सावरकरांच्या साहित्याची उंची सामान्यांना न पेलणारी आहे. अंदमानानंतरच्या काळातही त्यांनी विपुल लेखन केले. इतिहास, राजकारण, समाजशास्त्र, काव्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी विचार मांडले. त्यांची लेखनशैली तर्कशुद्ध, प्रखर आणि आक्रमक होती. त्यांनी रचलेली देशभक्तीपर गीते, नाटके आणि लेख यातून त्यांच्या मनातील राष्ट्रनिष्ठा व्यक्त होते. त्यांचे प्रभावी वक्तृत्व आणि जहाल लेखन यांचा ब्रिटीशांनी धसका घेतला होता असे मानायला जागा आहे. भाषिक स्वाभिमान हा त्यांच्या राष्ट्रवादाचा अविभाज्य भाग होता. इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन त्यांनी भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रनिर्मितीतील भाषेचे महत्त्व ते जाणून होते. त्यांच्या मते, भाषिक गुलामगिरी ही मानसिक गुलामगिरीचीच एक छटा आहे. सावरकरांच्या विचारांचे मूल्यांकन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ते मूलत: संघटनवादी होते. समाजाची ऊर्जा विखुरलेली न राहता एकत्र यावी, यासाठी त्यांची धडपड होती. त्यांना सामाजिक समता, सांस्कृतिक अभिमान आणि राजकीय सबलता ही त्रिसूत्री मान्य होती. विखुरलेला समाज कधीच सबळ राष्ट्र उभारू शकत नाही हे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी सामाजिक आत्मभान यावे म्हणून ‘हिंदू संघटन’ ही संकल्पना मांडली. राष्ट्रनिर्मितीत स्त्रियांचा सक्रिय सहभाग अपरिहार्य आहे, हा त्यांचा आग्रह त्या काळाच्या तुलनेत प्रगत मानला जातो.
सावरकरांचा खरा वारसा समाजाला अंतर्मुख करणाऱ्या या मुद्दयांमध्ये आहे. त्यांनी पेटवलेली विचारांची आणि कृतीची ज्योत केवळ इतिहासाच्या पानांवर नाही. ती विवेक, संघटन आणि आत्मभान यांची आठवण करून देणारी चेतना आहे. त्यांच्या जीवनातील सत्य पुराव्यांवर उभे रहावे. त्यांच्या कार्याची व्यापकता समजून घ्यावी आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या विचारांचे सार शोधावे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल.
(शब्दांकन – मेधा इनामदार)
डॉ. प्रीती पोहेकर
(अद्वैत फीचर्स)
