बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान
पुणे: सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि दिशादर्शक कार्य करणाऱ्या बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेला  सन २०२५ चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात आला, अशी माहीती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, जांभळी,  वेल्हे रोड, भोर, पुणे येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सोहळा २०२५ (उर्वरित) तसेच एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून  सतिश मराठे (संचालक – भारतीय रिझर्व्ह बँक) तसेच उदय जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष – सहकार भारती) उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक दामाजी डोंगरे व सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी  हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून महासचिव  शशिकांत राजोबा व खजिनदार  दादाराव तुपकर यांनी जबाबदारी पार पाडली. फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी व कार्याध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सभासदाभिमुख कार्यपद्धती यामुळे बल्लाळेश्वर पतसंस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी वाटचालीत सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे मोलाचे योगदान असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. हा पुरस्कार आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. हा गौरव संपूर्ण बल्लाळेश्वर परिवाराचा आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *