सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता
कल्याण: संकल्प संस्था आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा पंतवालावलकर स्कूल, नेहरू नगर येथे मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच समाजकार्याची आवड असलेल्यांसाठी संकल्प संस्थेच्या वतीने १९ आठवड्यांचा सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये समाजकार्य म्हणजे काय, समाजकार्याचे महत्त्व, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, गटकार्य, प्रचार- प्रसिद्धी माध्यमे, समाजकार्यकर्त्यांची भूमिका तसेच विविध सामाजिक समस्या अशा एकूण ५२ विषयांवर ३५ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून चार शनिवारी विविध सामाजिक संस्था, संघटना व शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. यासोबतच दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, स्वयं- परिचय व गट उपक्रम यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या गायत्री सज्जन वरिष्ठ वैद्यकीय समाज विकास अधिकारी, के. जे. सोमय्या हॉस्पिटल उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून युगंधरा कोळी अभिनेत्री, मॉडेल व रील स्टार तसेच गौरी राव अखिल चित्रपट महामंडळ सदस्या आणि अभिनेत्री व शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना तसेच सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील व रेश्मा जगताप यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *