ज्येष्ठ राजकीय भाष्यकार व लेखिका तवलीन सिंग यांचा समावेश इंग्रजी पत्रकारितेच्या आघाडीच्या संपादक पत्रकारांमध्ये करावा लागेल. गेली चाळीस एक वर्षे त्यांचे भेदक राजकीय भाष्य देशात वाचले जाते. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या आघाडीच्या लेखक संपादक वर्गातील अग्रगण्य व्यक्ती असेही त्यांना म्हणता येईल. त्यांचा समवेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भक्तवर्गात करण्याची चूक मात्र कुणी करू नये. कारण त्यांनी मोदींच्या तसेच भाजपाच्या अनेक निर्णयांवर टीकेची झोडही उठवली आहे. पण त्याच बरोबर चांगल्याला चांगले म्हणण्याचे धाडसही त्यांच्या लिखाणात आहे. रूढार्थाने मोदी ज्या समुहाचा उल्लेख ल्युटेन्स क्लब अशा शेलक्या शब्दात करतात त्या नवी दिल्लीतील उच्चभ्रु वर्तुळात त्यांचा वावर होता हे त्यांनी स्वतःच एका स्तंभ लेखात लिहून ठेवले आहे. अशा तवलीन बाईंनी अलिकडेच मोदींनी भारतात नेमका काय बदल घडवला व त्या तुलनेत राहुल व तत्सम काँग्रेस नेते नेमके कुठे आहेत याचा आरसाच लोकांसमोर धरला आहे. या एका लेखात त्या म्हणतात : “नर्रेद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. परंतु एका बदल कदाचित फारच थोड्या लोकांच्या लक्षात आला आहे. तो बदल म्हणजेच भारताचे ‘निर्वसाहतीकरण’. या बदलामुळे भारतात अस्तित्वात असलेला जुना, वसाहतवादी, सत्ताधारी वर्ग अक्षरशः पाचोळ्यारखा उडून गेला आहे. हा बदल अतिशय चांगला तर आहेच, परंतु तो फार पूर्वी घडायला हवा होता. भारताचा शासक वर्ग म्हणून आपण संपूर्णपणे अपयशी का आणि कसे ठरलो, हे समजावून सांगण्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे सक्षम मानते. कारण मीही त्याच इंग्रजाळलेल्या सत्ताधारी वर्गातील एक होते. प्रत्यक्षात आम्ही सारे म्हणजे पूर्णपणे निष्क्रिय आणि हतप्रभ झालेला एक समूह होतो. आम्हाला कोणतीच भारतीय भाषा धड बोलता येत नाही. पण त्यामुळे आमचे कधीच, काहीच बिघडले नाही. आम्हाला इंग्रजी चांगलं बोलता येतं याचाच आम्हाला प्रचंड अभिमान होता. चांगले इंग्रजी बोलू न शकणाऱ्या कुणी जर आमच्या दिवाणखान्यात येण्याचे धाडस केलेच तर आम्ही सदैव त्याची यथेच्छ थट्टा केली. ज्यांना खानपानाचे पाश्चात्य शिष्टाचार माहीत नव्हते त्यांना, म्हणजे थोडक्यात, काटे आणि सुऱ्या वापरण्याऐवजी हाताने खाणाऱ्यांना आम्ही तुच्छ लेखले.
परदेशात गेल्यावर, आपण भारतीय असल्याचा आव आम्ही आणायचो, पण भारतीय असणे म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याची पर्वा आम्ही कधीच केली नाही. भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल सर्व काही माहिती असल्याचे नाटक आम्ही छान वठवले. परंतु आम्हाला फारसे काहीच माहीत नव्हते. अर्थात, आम्ही ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकलो, तिथे आम्हाला पाश्चात्य संस्कृती, इतिहास आणि साहित्याबद्दल माहितीच मिळाली, आमच्या भारताबद्दल नव्हे! त्यामुळे तसे पाहता त्यात आमचीही चूक नव्हती. जेव्हा-जेंव्हा राजकारणाचा विषय निघाला किंवा निवडणुका आल्या, तेंव्हा आम्ही नेहरू-गांधी घराणे आणि त्यांच्या विविध वारसदारांप्रति निष्ठा व्यक्त केली. कारण आमच्या मते, ते आमच्यासारखेच लोक होते. भारतीय संसदेचे रूपांतर एखाद्या खाजगी क्लबमध्ये झाले आहे हे आमच्या खिजगणतीतही नव्हते. कारण आमच्या मते, तो आमचाच क्लब होता! सोनिया गांधींच्या अमदानीत काँग्रेस पक्षदेखील एक खाजगी क्लबच झाला आहे याचीही आम्हाला पर्वा नव्हती. कारण तोदेखील आमचाच क्लब होता. आमच्या दिवाणखान्यांमध्ये आम्ही सतत लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेबद्दल चर्चा करत असायचो. कारण, या संकल्पनांचे संरक्षण करण्यासाठी आम्हीच स्वतःला नियुक्त केलेले होते.
असे सगळे सुरळीत चाललेले असताना एक दिवस अचानक नरेंद्र मोदी आले, आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. भारतामध्ये घडलेल्या अनेक बदलांकरता वैयक्तिकरित्या मोदी जबाबदार नसतीलही. पण घडत गेलेल्या बदलांचे ते एक अविभाज्य घटक होते हे निःसंशय. मोदी जेंव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेंव्हाच आम्ही रातोरात केवळ शक्तीहीनच झालो असे नव्हे तर अक्षरशः कालविसंगत होऊन बसलो. इंग्रजी अजिबात नीट बोलता न येणाऱ्या, परंतु सफाईदारपणे हिंदी बोलणाऱ्या भारतीयांच्या एका नव्या गटाने सगळीकडून आम्हाला हद्दपार करत आमच्या जागा पटकावल्या – राजकीय विश्लेषक म्हणून, टीव्ही स्टुडिओमध्ये, पत्रकारितेत, बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये, सरकारी उच्चपदस्थांमध्ये – अगदी सगळीकडे!
आमच्या इंग्रजी भाषा कौशल्याने ते अजिबात बिचकले नाहीत. उलट, ते आमच्याहून किती जास्त ‘भारतीय’ आहेत हे जाणवल्यामुळे आम्हीच इतके प्रभावित झालो की त्यांचे अनुकरण करू लागलो. आमच्यापैकी काहीजण यशस्वीही झाले, पण बहुतेकांना यश मिळाले नाही.
मग झाले असे, की या वावटळीत तगून राहायची धडपड करणारे अनेकजण आज राहुल आणि प्रियांका गांधींना चिकटून बसले आहेत. त्यांना अजूनही आशा आहे की काहीतरी चमत्कार होईल आणि राहुल-प्रियांका मिळून मोदींना नक्की पराभूत करतील. अशा लोकांपैकी काहीजण ‘राजवंशा’च्या सध्याच्या वारसांचे सल्लागार म्हणून काम करतात. आपल्याला ‘संविधान वाचवायचं आहे’ आणि ‘लोकशाही टिकवायची आहे’ यासारख्या भव्यदिव्य कल्पना ते आपल्या डोक्यात घेतात आणि बोलूनही दाखवतात.
पण सत्य हे आहे की राहुल गांधींचा संदेश गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जो होता तोच आजही आहे. “मोदी भ्रष्ट आहेत, ते फक्त मूठभर श्रीमंत भारतीयांसाठी काम करतात, तुमचे पैसे चोरतात, राजकीय सभांमध्ये नुसती आरडाओरड करतात आणि अखेर तुमचा चोरलेला पैसा आपल्या श्रीमंत मित्रांना वाटतात.” पण हे नक्की घडतं तरी कसं? हे ते सांगणारेच जाणोत बापडे. आज राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे शीर्षस्थ नेता आहेत. मोदींना पराभूत करू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणून, विशेषतः परदेशी वार्ताहर त्यांच्याकडे पाहतात. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की, आपण सामान्य भारतीयांपैकीच एक आहोत हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करूनदेखील, भारतीय मतदारांसमोर राहुल गांधी आपला दावा अजिबात सिद्ध करू शकलेले नाहीत, हे त्यांचे मोठेच दुर्दैव म्हणावे लागेल. राहुल गांधींनी भातशेतांमध्ये शेतकऱ्यांसोबत काम केले, खाण कामगारांसोबत सायकलवरून कोळसा वाहून नेला, भाजी विक्रेत्यांची व्यथा ऐकली, आणि ‘सामान्य माणसाची’ किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी गॅरेजमध्ये बसून मेकॅनिकसोबतही बराच वेळ घालवला.एवढे सगळे करूनदेखील सामान्य भारतीय माणूस प्रभावित का होत नाही? कदाचित राहुल गांधींची अशी प्रत्येक कृती म्हणजे लोकांना केवळ दिखाऊपणाच वाटत असावा.
पण मग सामान्य भारतीय मतदारांना अधिक आकर्षित करणाऱ्या, तथाकथित ‘एकाधिकारशहा’, ‘हुकूमशहा’ मोदींची जादू नेमकी काय असेल? ग्रामीण भारतातल्या माझ्या अलीकडच्या प्रवासात मला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात आश्चर्यकारक बदल पाहिले. आणि त्यांना खरोखर असे वाटते की हे बदल मोदींमुळे झाले आहेत. तसे पाहता हे काही फार भव्यदिव्य बदल नाहीत. रस्ते, पिण्याचे पाणी, वीज आणि इंटरनेट सेवा यासारख्या साध्याच गोष्टी आहेत. पण ज्यांनी त्या आपल्या आयुष्यात कधीच पहिल्या नव्हत्या त्यांच्यासाठी ते बदल लक्षणीयच होते. यातल्या अनेक गोष्टी फार पूर्वीच घडायला हव्या होत्या. परंतु गोऱ्या वसाहतवाद्यांच्या छत्रछायेत वाढलेल्या आम्हा सत्ताधाऱ्यांच्या हे कधी लक्षातच आले नाही की सामान्य भारतीयांना मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा अतिशय हीन दर्जाच्या होत्या. आमच्या आलिशान दिवाणखान्यांपर्यंत अशा गोष्टींची झळ कधी पोहोचलीच नाही. सुरक्षित कोषामध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्यांना सरकारी रुग्णालयात किंवा सरकारी शाळेत जाण्याची कल्पनाही करणे अशक्य होते. ज्या बुडबुड्यात आम्ही आजवर सुखात जगलो तो मोदींच्या आगमनानंतर अचानक फुटला, आणि आमच्यापैकी बहुतेकांना हे का आणि कसे घडले याची कल्पनाही नाही. म्हणूनच काही लोक एक वेडी अशा उराशी धरून आहेत की निदान यावेळी तरी मोदींचा पराभव होईल. तेच लोक मग मतदारांना सांगत फिरतात की लोकशाही धोक्यात आहे. निकाल आल्यानंतर मात्र अशा लोकांच्या पदरी पुन्हा निराशाच येण्याची दाट शक्यता आहे. ज्याला मोदी म्हणजे एक भ्रष्ट हुकूमशहा आहेत असे वाटते, असा कोणीही व्यक्ती मला तरी ग्रामीण भारतात कोणीही भेटला नाही !!