जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न
कल्याण: पोलीस हवालदार स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित मास्टर्स कप चॅम्प्स टी-२० स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या करण क्रिकेट अकॅडमी या संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा प्रतिवर्षी ११ वर्षाखालील युवा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा दोन गटांमध्ये खेळवण्यात आली. स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील १८ संघाला प्रवेश देण्यात आला होता. ही स्पर्धा कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या क्रीडांगणावर घेण्यात आली. स्पर्धेचे आयोजन संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, कल्याण व स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अंतिम सामना पनवेल करण अकॅडमी आणि ठाणे येथील श्री मा गुरुकुल स्कूल यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून करण अकॅडमीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. २० षटकांत ११८ धावा करत ११९ धावांचे आव्हान श्री माँ गुरुकुल ठाणे समोर ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्री माँ गुरुकुल ठाणे संघाला करण क्रिकेट अकॅडमीच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरता आला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी व शिस्तबद्ध क्षेत्ररक्षणाच्या जोरावर करण क्रिकेट अकॅडमीने श्री माँ गुरुकुल ठाणे संघाला विजयाच्या लक्ष्यापासून दूर ठेवत विजेतेपद मिळवले. श्री माँ गुरुकुल ठाणे संघाने उपविजेतेपद मिळवले. तर पियुष दांडेकर हा सामनावीर ठरला. पारितोषिक वितरण समारंभाला संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी सचिव संतोष पाठक, केअर फाउंडेशन अध्यक्ष अविनाश ओंबासे, करण क्रिकेट अकॅडमी सचिव व प्रशिक्षक करण सर, श्री माँ गुरुकुल ठाणे मुख्य प्रशिक्षक दर्शन भोईर, प्रशिक्षक अजय, संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी मुख्य प्रशिक्षक परेश हिंदुराव, मंगेश ब्रीद आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली मध्ये क्रिकेट खेळाची आफाट लोकप्रियता असून लहान मुलांमध्ये टॅलेंट आहे. ते हेरून जिल्ह्यातील छोट्या क्रिकेटपटूंना योग्य संधी मिळावी तसेच अशा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करावी हा उद्देश या स्पर्धेचा आहे असे आयोजक संतोष पाठक यांनी सांगितले.
