केडीएमसी क्षेत्रातील उद्यानांच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण पश्चिम येथील बहुतांश उद्यानात अस्वच्छता पसरली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिला होता मात्र संबंधित ठेकेदारांकडून उद्यानांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे. बहुतांशी उद्यानांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी योग्य जागा नाही आहे, दुर्गंधी पसरली आहे. उद्यानाचा वापर कॅन्टीन चालवण्यासाठी केला जात आहे त्यामुळे संबंधित विभाग करतो काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, धर्मवीर आनंद दिघे नाना-नानी पार्क व आंबेडकर उदयान याचा ठेका देखभाल दुरूस्तीसाठी दिलेला असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांचे हास्य क्लब, महिला वर्गाचा हास्य क्लब तसेच दोन्ही ठिकाणी नागरीक मोठया प्रमाणात फिरायला येत असतात. दोन्ही ठिकाणचे असलेले शौचालय पूर्णपणे दुर्गंधीने भरलेले असतात. तसेच त्या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा, इतर खादय पदार्थ, दारूच्या बाटल्या वारंवार पडलेल्या दिसत असून त्यामुळे नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी पहायला मिळत आहे. उदयाने ठेका पध्दतीने दिलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी या ठेकेदाराची असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नसल्याकारणाने अनेक अनुचित प्रकार या ठिकाणी घडत असतात.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती माजी नगरसेवक मोहन उगले यांनी उदयान अधिक्षक संजय जाधव यांना वारंवार दिलेली आहे. परंतू या विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने उगले यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन देत लक्ष वेधले आहे.
