बल्याणीत रमजान निमित्त लावलेले बॅनर फाडले
कल्याण: बल्याणी परिसरातील पीर वली शहा बाबा दर्गा येथे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग क्र. ४ शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट यांचे अधिकृत बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या भावना दुखावणारे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या घटनेमागील दोषींवर पोलिस प्रशासनाने तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी केली आहे.
