अभिनव महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
मिरा – भाईंदर: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत आयोजित महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय म्हणून अभिनव महाविद्यालयाने यावर्षी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल नुकतेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री रवींद्र साठे यांच्या हस्ते अभिनव महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऑलविन मेनेजिस,करिअर कट्टा समन्वयक प्रा. प्राजक्ता राऊत व प्रा. भरत राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
करिअर कट्टा अंतर्गत उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. तसेच करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सौरऊर्जा जनजागृती कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने राबविण्याचा मान अभिनव महाविद्यालयाने मिळविला असून “AWS Career Tour” कार्यक्रमही ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने यशस्वीपणे आयोजित करण्यात आला आहे.
करिअर कट्टा उपक्रमाच्या या यशाबद्दल अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोल पाटील, कार्यवाह मंगेश पाटील, सहकार्यवाह प्रकाश पाटील, खजिनदार अशोक पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील, महाविद्यालय विकास समितीचे किरण पाटील, कार्यकारणी सदस्य यांनी करिअर कट्टा विभागाचे अभिनंदन केले आहे.
