ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान
अनिल ठाणेकर
ठाणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषेचे प्राचीनत्व’ (मराठी भाषेच्या जन्मापासून आजवरची स्थित्यंतरे) या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार २७ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषेची उत्पत्ती, तिची प्राचीन मुळे, संत साहित्याची परंपरा, शिवकालीन आणि पेशवेकालीन काळातील भाषेची भूमिका, तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेचे बदलते स्वरूप यांचा सखोल आढावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे  आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत.मराठी भाषेचा उगम, तिचे संस्कृत आणि प्राकृत भाषांशी असलेले नाते, विविध शिलालेख आणि ऐतिहासिक दस्तऐवजांतील उल्लेख, तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या साहित्यामुळे भाषेला लाभलेले वैभव यावरही ते प्रकाश टाकणार आहेत. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक आहे, हा संदेश या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे.जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी, साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *