ठामपा शाळा क्र. ७ मध्ये मराठी भाषा उत्साहात साजरा
ठाणे : ज्येष्ठ कवी, साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून टेंभी नाका शाळा क्र. 7, इंग्रजी माध्यम (बालवाडी विभाग) यांच्या वतीने आज दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत साहित्याच्या स्मरणाने करण्यात आली. पालखीत संत ज्ञानेश्वर यांची आकर्षक व सुशोभित प्रतिमा ठेवण्यात आली होती. फुलांची सजावट, पारंपरिक रांगोळी आणि ढोल-ताशांच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला.बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठी संस्कृतीची झलक सादर केली. मुलांनी “मराठी असे आमची मायबोली”, “जय जय महाराष्ट्र माझा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. काही विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे सादरीकरण केले, तर काहींनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषणेही केली.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा याविषयी माहिती दिली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही मातृभाषेबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान निर्माण व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *