इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घुमला मराठी संस्कृतीचा जागर
मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
भारूड आणि मंगळागौरीने जिंकली पालकांची मने
कल्याण : कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर संचलित मॉडेल इंग्लिश हायस्कूल मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जरी हे इंग्रजी माध्यमाचे विद्यालय असले, तरी या शाळेत मराठी भाषा आणि संस्कृतीचा वारसा जपत प्रत्येक सण-उत्सव उत्साहात साजरा करण्याची परंपरा कायम राखली गेली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय कल्पकतेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘पोषण आहार’ या विषयावर आधारित गीतांतून ‘से नो टू जंक फूड’ असा सामाजिक संदेश दिला. त्यानंतर मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा असलेले ‘भारूड’ सादर करून लोककलेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती विद्यार्थिनींनी सादर केलेली ‘मंगळागौर’. अत्यंत सुबक आणि लयबद्ध हालचालींनी मुलींनी मंगळागौरीचे खेळ सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. “दात्याचा दातवण घ्या गं कुणी…” या गाण्याने संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य निर्माण केले.
एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी दिनाचे इतके भव्य आणि पारंपरिक आयोजन पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. आपली मुले इंग्रजी शाळेत शिकत असली, तरी त्यांना आपल्या मायबोलीचा आणि संस्कृतीचा विसर पडू नये, ही शाळेची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार यावेळी पालकांनी काढले. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना आणि संस्कृतीची जाणीव जागरूक राहावी, या हेतूने आम्ही शाळेत सर्व कार्यक्रम साजरे करतो. या उपक्रमांत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, कर्मचारी आणि संस्थेचे सर्व सदस्य हिरीरीने सहभागी होतात. अशा भावना शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे कल्याण पूर्व परिसरात मॉडेल इंग्लिश हायस्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाची विशेष चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *