साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस
रमेश औताडे
मुंबई : पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतत तीन वर्षे कनेरसर, मुंबई , राजगुरुनगर येथे साहित्य संमेलन आयोजित करून विविध क्षेत्रात कार्यरत राहून साहित्यासाठी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे हे उल्लेखनीय योगदान देत आहेत असे मत ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी तिसऱ्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
दोन कवितासंग्रह, लेखसंग्रह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर मराठी व इंग्रजीत पुस्तकांचे लेखन, अनेक स्मरणिका व विशेषांकाचे संपादन करून अशोकराव टाव्हरे हे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून नावारूपास येत आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याचे टाव्हरे यांचे कसब व त्यांची पत्नी सुरेखा टाव्हरे यांची त्यांना असलेली साथ गेली तीन वर्षे साहित्य संमेलनात अनुभवत आहे असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नमुद केले.
पुर- कनेरसर चे सुपुत्र व विश्व साहित्य नामदेवराव ढसाळ यांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी टाव्हरे गेली तीन वर्षे साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन करीत आहेत. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस व त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री ललिता सबनीस यांनी टाव्हरे दाम्पत्याचा सन्मान केला.
