पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी आम्ही वचनबद्ध
मुंबई : लीलावती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने (लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट – एलकेएमएमटी) सध्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल चॅनेलद्वारे प्रसारित झालेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक बातम्यांचे आरोप फेटाळले आहेत. हे सर्व दावे खोटे आहेत असे रुग्णालयाचे म्हणणे आहे. लीलावती रुग्णालय हे वैधानिक नियमांचे पालन करत कार्यरत आहे. पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे.
लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होताच रुग्णावर तात्काळ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात येतात. चॅरिटेबल ट्रस्टच्या धोरणानुसार व कायदेशीर जबाबदाऱ्यांनुसार रुग्णांवर मोफत उपचार सुरू असून कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा उपचार नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त राजीव किशोर मेहता यांनी स्पष्ट केले. हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात एक हजार कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.
एक रुग्णाची आई प्रमिला चौधरी सांगतात की, माझ्या मुलाला अपघातानंतर लगेच दहिसरच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर प्लास्टिक सर्जरीसाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये आणले. कोणतीही ठेव रक्कम न घेता मानवतेच्या आधारावर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. उपचार नाकारल्याचे जे कोणी आरोप करत आहेत ते चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले.
