केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला
आरोग्य कर्मचाऱ्यांचा केडीएमसी बाहेर ठिय्या
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून, जुलै महिन्यापासून वाढीव पगार थकबाकी तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा थकबाकी पगार मिळावा या मागणीसाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालया बाहेर ठिय्या मांडला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनएचयुएम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून सुरळीत पगार होत नाही. तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा पगार जमा झालेला नाही. तसेच जुलै २०२५ पासूनचा वाढीव पगार मिळालेला नाही. इतर महानगरपालिका एनएचएम कर्मचार्यांना १५ हजार वाढीव पागार देते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणताही वाढीव पगार देत नाही. तसेच नागरी आरोग्य केंद्रातील एएनएम, जीएनएम यांचे रिक्षा बिल, सपोर्ट ग्रुप, आरोग्य वर्धिनी ही बिले थकीत आहेत.
या सर्व समस्यांमुळे एनयुएचएम स्टाफलं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
