खुशखबर! आता फक्त ४५ हजारांत बसवा सोलर
महावितरणच्या निर्णयामुळे ग्राहकांचे १५ हजार वाचणार!
हरिभाऊ लाखे
नाशिक – महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या निविदेत एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी पाच लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॉटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे.
राज्य सरकार गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबवत असून त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या निविदेला मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रति किलोवॉट ५० हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रती किलोवॉट सुमारे ६० हजार रुपये आकारतात. पण महावितरणने मंजूर केलेल्या निविदेत प्रती किलोवॉट ४५,४५० रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल.
केंद्र सरकारचे अनुदान कसे?
केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॉटला ३० हजार रुपये, दोन किलोवॉटला ६० हजार रुपये व तीन किलोवॉटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. ऊर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एक किलोवॉटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज देयक शून्य येते व ग्राहकाला अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. राज्य सरकारने या योजनेत राज्यातर्फे आणखी अनुदान देऊन दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आणली आहे. प्रत्येकी एक किलोवॉटचे सौरऊर्जा प्रकल्प या योजनेत बसविण्यात येतील.
गरजुंना लाभ घेणे सुकर…
महावितरणने स्मार्ट योजनेसाठी मागवलेल्या निविदेत एक किलोवॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४५,४५० रुपये इतका कमी दर निश्चित झाल्यामुळे आता अन्य गरजू वीज ग्राहकांनाही लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सरकारी अनुदानाशिवाय ऊर्वरित रक्कम ग्राहकाला भरावी लागते. या रकमेत मोठी घट झाल्यामुळे छोट्या गरजू वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सूचिबद्ध पुरवठादारांची यादी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर आणि स्मार्ट योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध केली आहे.
