रुस्तमजी अझियानोमध्ये रंगली शिस्तबद्ध आणि इको-फ्रेंडली रंगपंचमी
ठाण्यातील रुस्तमजी अझियानो संकुलात यंदाची २०२६ सालची धुळवड मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. अझियानो उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रंगपंचमी सोहळ्याने रहिवाश्यांचे मन जिंकले.
यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलांची रंगपंचमी आणि इको-फ्रेंडली हर्बल रंगांचा वापर. ढोल-ताशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डीजेच्या तालावर जवळपास १९०० रहिवाशांनी एकत्रित थिरकत रंगोत्सवाचा आनंद लुटला. मानवनिर्मित शॉवर फवाऱ्यांच्या पावसात रंगलेला आनंद आणि लहानग्यांसाठी खास पाण्याच्या डबक्याची व्यवस्था यामुळे वातावरण आणखी रंगतदार झाले.
संपूर्ण कार्यक्रम सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी आयोजकांनी विशेष खबरदारी घेतली होती. ठिकाणी अँम्ब्युलन्स, व्हीलचेअर, फर्स्ट-एड बॉक्स, मदतनीस तरुण, आवश्यक संपर्क क्रमांक तसेच सिक्युरिटी गार्ड तैनात ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रहिवाश्यांनी निर्धास्तपणे उत्सवाचा आनंद घेतला.
कार्यक्रमानंतर रहिवाश्यांसाठी आकर्षक खाऊगल्लीची व्यवस्था करण्यात आली होती. विविध चटपटीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत उत्सवाची सांगता करण्यात आली.
अझियानो उत्सव मंडळाच्या तरुणाईने एकत्रितपणे केलेले नियोजन, रहिवाश्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि एकात्मतेची भावना यामुळे हा रंगोत्सव अविस्मरणीय ठरला. या सुंदर आणि सुरक्षित आयोजनाबद्दल मंडळाच्या संपूर्ण टीमचे तसेच रुस्तमजी अझियानो संकुलातील (E ते K) सर्व रहिवाश्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
