नाशिक मनपाचा ‘बड्या’ थकबाकीदारांना दणका!

उद्यापासून वाजणार घरासमोर ढोल, जप्तीची कारवाई सुरू

हरिभाऊ लाखे

नाशिक : घरपट्टीच्या साडेसातशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजना टप्पा २ ची मुदत गुरुवारी संपुष्टात येत आहे. या मुदतीतही थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने धडक कारवाईची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी विभागातील पाचशे या प्रमाणे तीन हजार बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, या सर्व थकबाकीदारांना शुक्रवारपासून जप्ती वॉरंट बजावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वादन केले जाणार आहे. महापालिकेच्या घरपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ७५२ कोटींवर गेला आहे. या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान अभय योजना लागू केली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने थकबाकीदारांविरोधात कारवाईला सुरुवात केली होती.

प्रत्येक विभागातील दोनशे याप्रमाणे १,२०० बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंटही बजावण्यात आले होते. थकबाकी वसुलीसाठी विभागीय कार्यालयांच्या स्तरावर सायकल रॅली, मोटारसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात आले. महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्याच महासभेत घरपट्टीच्या थकबाकीदारांसाठी अभय २ योजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. या योजनेची मुदत गुरुवारी संपुष्टात येत आहे. आतापर्यंत २५० कोटींची घरपट्टी वसूल झाली आहे. त्यात चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट हे २६० कोटींचे देण्यात आले होते. त्यापैकी १३१ कोटींची वसुली झाली आहे. तर ७५२ कोटींच्या थकबाकी पैकी जेमतेम ११९ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.

मनपाने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी नगररचना विभागाने भोगवटा दाखला दिलेल्या; परंतु पालिकेच्या कर विभागाच्या दप्तरी नोंद नसलेल्या मालमत्तांचाही शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात २३ हजार २३३ नव्या मिळकतींची कर विभागाच्या दप्तरी नोंद होऊन त्यांना घरपट्टी लागू करण्यात आली आहे. या नवीन मालमत्तांच्या दंड आणि कर आकारणीतून मनपाचे चालू आर्थिक वर्षात ४६ कोटी ३७ लाखांचे उत्पन्न वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *