क्ले पेव्हर ब्लॉकचे खड्डेमय रस्ते दुरुस्तीला सुरुवात
शिवाजी शिंदेंचा पुढाकार
मुकुंद रांजणे
माथेरान: माथेरान मधील बहुतेक ठिकाणी ठेकेदाराकडून लावण्यात आलेल्या निकृष्ट क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे त्यावरून पायी चालत जाणे पर्यटकांना त्रासदायक ठरत होते. विशेष म्हणजे या रस्त्यावरूनच सातत्याने ई रिक्षा धावते त्यावेळी खड्डेमय रस्त्यांमुळे या पर्यावरण पूरक वाहनाचे पाटे तुटण्याचे प्रमाण वाढले होते. ही खर्चिक बाब सर्वसामान्य ई रिक्षा चालकांना परवडणारी नव्हती. याकामी प्रभाग क्र. ३ मधील कस्तुरबा रोडवरील ज्या ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत त्या जागी चांगल्या दर्जाचे क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. विद्यमान नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे यांच्या सूचनेनुसार ही महत्वपूर्ण कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. याच मार्गावरून नियमितपणे शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षातून ने आण केली जाते त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग याच सेवेचा लाभ घेताना दिसतात. परंतु आजवर कोणत्याही अधिका-यांनी ई रिक्षाची मोफत सेवा प्राप्त करून देखील रस्ते सुस्थितीत असावे याबाबत चकार शब्द काढला नाही. किंवा त्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न सुध्दा केलेले नाहीत असे नागरिक बोलत आहेत. नगरसेवक शिवाजी शिंदे, नगरसेविका रिझवाना शेख यांच्या प्रयत्नामुळे या भागात उत्तम प्रकारे रस्ते केले जात आहेत. याप्रमाणे दस्तुरी वरून येताना अनेक भागात क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत ते सुद्धा लवकरच दुरुस्त करावेत.वखारी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज रोड पर्यंतचा अपूर्ण असणारा क्ले पेव्हर ब्लॉकचा रस्ता,गव्हाणकर शाळेपर्यंतचा रस्ता लवकरच बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि ई रिक्षा चालकांमधून होत आहे.
