दुसऱ्या दिवशीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
नगरसेविका डॉ. तनुजा वायले, शालिनी वायले यांची आंदोलक आणि प्रशासनात मध्यस्थी
एक महिन्याचा पगार केडीएमसी त्वरित देणार
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून, आज दुसऱ्या दिवशीही या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांची नगरसेविका डॉ. तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी भेट घेत समस्या जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या या समस्या आयुक्तांपुढे मांडून एका महिन्याचा पगार महापालिका त्वरित देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर इतर महानगरपालिकेत या आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन भत्ता दिला जातो. असाच प्रोत्साहन भत्ता केडीएमसी अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना मिळावा यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे नगरसेविका डॉ. तनुजा वायले यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनयुएचएम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून सुरळीत पगार होत नाही. नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा पगार जमा झालेला नाही. तसेच जुलै २०२५ पासूनचा वाढीव पगार मिळालेला नाही. इतर महानगरपालिका एनयुएचएम कर्मचार्यांना १५ हजार वाढीव पागार देते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणताही वाढीव पगार देत नाही. तसेच नागरी आरोग्य केंद्रातील एएनएम, जीएनएम यांचे रिक्षा बिल, सपोर्ट ग्रुप, आरोग्य वर्धिनी हि बिले थकीत आहेत. या सर्व समस्यांमुळे एनयुएचएम स्टाफलं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे.
आज दुसऱ्या दिवशी देखील या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले होते. यावेळी या आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात नगरसेविका डॉ. तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांची बाजू आयुक्तांपुढे मांडली. या आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार हा शासनाकडून येत असल्याने विलंब होत असून कर्मचार्यांची अडचण लक्षात घेता महापालिकेच्या वतीने एक महिन्याचे वेतन महापालिका त्वरित देणार असल्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले.
तर आपण स्वता डॉक्टर असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्याला कळतात. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका याठिकाणी एनयुएचएम कर्मचार्यांना महापालिकेतर्फे १५ हजार प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एनयुएचएम कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे वायले यांनी सांगितले
