महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात!

शतक महोत्सवी वर्षात ऐतिहासिक पाऊल

मुंबई : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली! क्रीडा अर्थव्यवस्थेला नवे पंख देणाऱ्या निर्णयांची नांदी आज मुंबईत रुजवली!  उद्योग, गुंतवणूक आणि उद्योजकतेच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) ने क्रीडा उद्योग विकास विभागाची अधिकृत स्थापना २१ जानेवारी २०२२६ रोजी केली. शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या MACCIA ने या उपक्रमाद्वारे क्रीडेला औद्योगिक ओळख देत राज्याच्या क्रीडा अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि जागतिक संधींचा महामार्ग खुला करण्याचा निर्धार या नव्या विभागाने केला आहे. ४ मार्चला  क्रीडा उद्योग विकास समितीची घोषणा रवींद्र माणगावे (अध्यक्ष, MACCIA) यांनी केली.

नेतृत्वाची दमदार फळी

क्रीडा उद्योग विकास विभागाची समिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे:

  • चेअरमन – सुनील वालावलकर, सह-चेअरमन – मंदार वैद्य
  • सदस्य – क्षितिज वेदक, बाळासाहेब (बाळ) तोरसकर, विपुल सोळंकी, वैशाली भिडे-बर्वे, पौलोमी कुंडू.

तसेच, रवींद्र माणगावे (अध्यक्ष, MACCIA) आणि करुणाकर शेट्टी (उपाध्यक्ष, MACCIA) हे पदसिद्ध पदाधिकारी म्हणून समितीला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे या विभागाच्या कामाला अधिक बळ मिळणार आहे.

शतक महोत्सवी वर्षात ऐतिहासिक पाऊल

MACCIA च्या शतक महोत्सवी वर्षात क्रीडा उद्योग विकास विभागाची स्थापना हा एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय मानला जात आहे. औद्योगिक, कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रात भक्कम कार्य करणाऱ्या MACCIA ने आता क्रीडा क्षेत्रालाही उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे.

क्रीडेला उद्योगाचा दर्जा देण्याचा ठाम संकल्प

नवस्थापित क्रीडा उद्योग विकास विभाग क्रीडा क्षेत्राला केवळ खेळापुरते मर्यादित न ठेवता, ते उद्योजकता, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहभाग निर्माण करणारे सक्षम आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. राज्यातील क्रीडा उद्योग अधिक संघटित, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा व्यापक रोडमॅप या विभागाद्वारे राबविण्यात येणार आहे असे रवींद्र माणगावे (अध्यक्ष, MACCIA) यांनी स्पष्ट केले.

MSME, गुंतवणूक आणि PPP वर विशेष भर

या समितीवर क्रीडा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मजबूत करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच, क्रीडा उद्योगात गुंतवणूक सुलभता वाढविणे, क्रीडा पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक-खासगी-भागीदारी (PPP) मॉडेल राबविणे, क्रीडा तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समिती विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच क्रीडा क्षेत्राला अधिकृतपणे उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे विविध उपाययोजना आणि धोरणात्मक प्रस्ताव सादर केले जाणार आहेत.

महाराष्ट्र क्रीडा उद्योगाचे केंद्र बनणार!

या नव्या विभागाच्या माध्यमातून राज्यातील क्रीडा क्षेत्राला व्यावसायिक बळ मिळणार असून रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ आणि जागतिक संधींचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य क्रीडा उद्योग केंद्र बनविण्याच्या दिशेने हे पाऊल निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

क्रीडा क्षेत्रासाठी नवे पर्व सुरू

MACCIA च्या क्रीडा उद्योग विकास विभागाच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उद्योगाभिमुख परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धोरणात्मक विचार, सक्षम नेतृत्व आणि व्यापक दृष्टीकोन यांच्या बळावर क्रीडा क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

फोटो ओळ (डावीकडून) : क्षितिज वेदक, सुनील वालावलकर, पौलोमी कुंडू, करुणाकर शेट्टी, रवींद्र माणगावे, मंदार वैद्य, वैशाली भिडे-बर्वे, बाळासाहेब (बाळ) तोरसकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *