शरद पवार, पार्थ पवार, ज्योती वाघमारेंसहीत भाजपाचे चार उमेदवार बिनविरोध खासदार

मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामानंतर अखेर निवडणूक बिनविरोध झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत निश्चित होत नव्हता. शिंदेंकडून दोन उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आणि घोडाबाजार होऊन मविआचे उमदेवार शरद पवारांसोबत दगाफटका होणार अशीही चर्चा होती. पण शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंनी पक्षातील दिग्गज नेत्यांना धोबीपछाड देत कष्टकऱ्याच्या मुलीला सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेच्या खासदारकीचे तिकीट देत सर्वांनाच चक्रावून सोडले. शिंदें यांच्या मास्टर स्ट्रोकने लाडक्या बहीणींचा भाऊ ही त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा उंचावली असून पक्षातील इच्छुक दिग्गजांनाचाही बंदोबस्त त्यांनी केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील सात जागांसाठी अखेर सात अर्ज दाखल झाले. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं समोर आलं आहे.

शरद पवार-पार्थ पवारांचे दोन अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकादा अर्ज जरी चुकून बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहणार आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना हजर राहता आलं नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आजारी व्यक्ती राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकला नाही अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना घडली.

भाजपचे उमेदवार- रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते, आणि रामराव वडकुते

शिवसेना शिंदे गट-
ज्योती वाघमारे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-
पार्थ पवार

महाविकास आघाडी –
शरद पवार

चौकट

ज्योती वाघमारेंचा संघर्षमय प्रवास

डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले. उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *