आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
रुक्मिणीबाई रुग्णालयात वापरली जात आहे कालबाह्य एक्सरे मशीन
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून रुक्मिणीबाई रूग्णालयात वापरली जाणारी एक्सरे मशीनची वैधता २०२१ साली संपली असतांना देखील अद्यापही ही एक्सरे मशीन वापरून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप आंबेडकरी युवा मोर्चाने केला आहे. तसेच कल्याण येथील श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील आंबेडकरी युवा मोर्चाचे मार्गदर्शक डॉ प्रशांत इंगळे यांनी केला आहे. यावेळी अध्यक्ष विनोद भालेराव, प्रदीप सोनावणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खाजगी हॉस्पिटल कडून जी सामान्य जनतेची लूट होत आहे ती थांबली पाहिजे याकरिता सेवांचे दरपत्रक दर्शनी भागात बंधनकारक आहेत व ते सर्व खाजगी रुग्णालयात लावले गेले पाहिजेत. जर एखादे खाजगी हॉस्पिटल या नियमांचे उल्लंघन करत असेल किंवा दरपत्रक लावत नसेल तर त्वरित त्याची मान्यता रद्द करण्यात यावी. महानगरपालिका स्तरावर कोणत्याही प्रकारच्या समस्येकरीता एक टोल फ्री नंबर चालू करण्यात यावा. केडीएमसी संचालित बाई रुक्मिणीबाई हॉस्पिटल व शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये स्वस्त व जेनरिक औषधे उपलब्ध असतानाही कमिशनखोरी मुळे रुग्णांना खाजगी मेडिकलकडे पाठविले जाते त्यामुळे सामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे.
त्यामुळे श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात झालेल्या भ्रष्टाचारात सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आली असून लवकरात लवकर जीवरक्षा ॲनिमल वेलफेअर संस्थेकडून या पैशांची वसुली करण्यात यावी. श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक व रुग्ण संहिता लावण्यात यावी. रुक्मिणीबाई रुग्णालयातील कालबाह्य झालेली आजही वापरात असलेली एक्सरे मशीन तात्काळ बदलण्यात यावी.
रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्री नगर रुग्णालय येथे रुग्णांना सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करुन द्यावी व रुग्णांना खाजगी मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेण्यास सक्ती करू नये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आरोग्य सेवक/सेवीकांचे मागील ४ महिन्यापासून थकलेले मानधन त्वरित देण्यात यावे आदी मागण्या यावेळी आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.
