आयुष बिडवईची अष्टपैलू कामगिरी

ठाणे : सामनावीर ठरलेल्या आयुष बिडवईची अष्टपैलू कामगिरी आणि आकाश जांगिडच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने मालवण कट्टा संघाचा चार गडी राखून पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात आगेकूच केली. मालवण कट्टा संघाचे २२५ धावांचे आव्हान अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने २८ व्या षटकात २२७ धावा करत पार केले.

सुरुवातीला वैभव लांडेच्या ६६ आणि अनिकेत परिहारच्या नाबाद ४६ धावांमुळे मालवण कट्टा संघाने २२५ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या ओम कांबळेने २८ आणि ऋषिकेश पवारने २५ धावांची भर टाकली. अभिषेक श्रीवास्तव आणि आयुष बिडवईने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

उत्तरादाखल आकाश जांगिडने तडाखेबंद नाबाद ८१ धावांची खेळी करत संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला.  फलंदाजीतही छाप पाडताना आयुषने ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भूषण पाटीलने ३२ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीतही आपली उपयुक्तता दाखवून देताना वैभव लांडे आणि ध्रुव गोठीने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक – मालवण कट्टा : ३५ षटकात ८ बाद २२५ ( वैभव लांडे ६६, अनिकेत परिहार नाबाद ४६, ओम कांबळे २८, ऋषिकेश पवार २५, अभिषेक श्रीवास्तव ७-४९-२, आयुष बिडवई ५-२९-२) पराभुत विरुद्ध अरुप्रीत टायगर्स एलएलपी: : २८ षटकात ६ बाद २२७ ( आकाश जांगिड नाबाद ८१, आयुष बिडवई ५२, भूषण पाटील ३२, वैभव लांडे ४-३०-२, ध्रुव गोठी ७-३५-२).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *