अल्पसंख्यांक आयोगावर सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करा
दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनची राज्यपालांकडे मागणी
कल्याण : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगावर घटनेप्रमाणे सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करण्याची मागणी दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनने राज्यपालांकडे केली असून राज्य सरकार कडून दोन महिन्यात नियुक्ती न झाल्यास या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनचे संस्थापक नोवेल साळवे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांची नियुक्ती राज्य सरकार कडून करण्यात आली होती. ही गोष्ट एका प्रकारे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी व त्यांना ताकद देण्यासाठी उपयुक्त ठरेल. परंतु घटनेप्रमाणे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगावर अल्पसंख्यांक असलेले काही जाती धर्माच्या व्यक्तींचा समावेश न केल्यामुळे राज्य अल्पसंख्यांक आयोग पुर्ण मानले जाऊ शकत नाही. यासाठी राज्य सरकारने त्या सर्व जाती धर्माच्या व्यक्तींच्या नावाचा अल्पसंख्यांक आयोगावर समावेश करून नियुक्ती करावी जेणेकरून कुठल्याही अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होणार नाही. येत्या दोन महिन्यात अपुर्ण असलेल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला घटनेप्रमाणे पुर्ण करावेत, अन्यथा नाईलाजाने अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी आंदोलन करावा लागेल असा इशारा साळवे यांनी दिला आहे.
