अंधेरीत संतांची मांदियाळी
पादुकांच्या दर्शनाचा भव्य सोहळा
मुंबई : मेराक इव्हेंट्स यांच्या वतीने भक्तांसाठी अत्यंत आध्यात्मिक आणि दुर्मीळ असा ‘युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा’ रविवार, ८ मार्चला अंधेरी (पूर्व) येथील वृंदावन सहनिवास पटांगण, जीवा महाले मार्ग, जम्बोदर्शन समोर येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा दर्शन सोहळा होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
या पवित्र सोहळ्यात विविध संतांच्या पवित्र पादुकांचे एकत्रित दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी भाविकांना मिळणार आहे. यात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ, शिर्डी येथील श्री साईबाबा, निमोण येथील साईबाबा, जयपूर-कोथळी येथील श्री गजानन महाराज, सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी तसेच जंगली महाराज यांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
याशिवाय संतांनी वापरलेल्या काही पवित्र वस्तूंचेही दर्शन या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. यात स्वामी समर्थांची गोंड्याची टोपी, साईबाबांनी परिधान केलेले वस्त्र, ढब्बू पैसा, चरण पादुका, चांदीचा टाक, गजानन महाराजांची चिलीम, रामदास स्वामींच्या पूजेतील हनुमानाची पंचधातूची मूर्ती तसेच जंगली महाराजांचा कमंडळू अशा अनेक पवित्र वस्तू भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
दिवसभर भक्तीमय वातावरणात भक्तिगीते, भजन तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या ‘मानसपूजे’चे उद्घाटन होणार आहे. यावेळी राहुल देशपांडे भक्तिगीतेही सादर करणार असून उपस्थित भक्तांना एक आगळावेगळा आध्यात्मिक व संगीतमय अनुभव मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक हेटे परिवार असून विशेष सहकार्य अथर्व रिअल्टी आणि श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले (पूर्व) यांचे लाभले आहे. संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दर्शन सोहळ्याच्या स्थळाची माहिती क्यूआर कोड स्कॅन करूनही मिळू शकते.
