महिला नेतृत्वाला चालना देण्यासाठी ‘गिव्ह टू गेन’ चर्चासत्र मालिका

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ निमित्त हवार्थ इंडियातर्फे ‘गिव्ह टू गेन’ या संकल्पनेवर आधारित विशेष नेतृत्व चर्चासत्र मालिकेचे आयोजन करण्यात आले. आर्किटेक्चर व डिझाइन क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमधील वरिष्ठ महिला नेत्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेतील दोन सत्रे दिल्ली आणि मुंबई येथे पार पडली असून पुढील कार्यक्रम बेंगळुरू आणि हैदराबाद येथे होणार आहेत.

या चर्चासत्रांमध्ये वरिष्ठ आर्किटेक्ट्स, डिझाइन क्षेत्रातील आघाडीचे अधिकारी आणि विविध भागधारक सहभागी झाले होते. पॅनेल चर्चेनंतर श्रोत्यांशी संवाद साधण्यात आला. महिलांच्या नेतृत्वाचा संस्थांच्या कामगिरीवर होणारा सकारात्मक परिणाम हा चर्चेचा मुख्य विषय होता. कार्यालयांचे सुयोग्य नियोजन, मार्गदर्शन आणि सहकार्याच्या वातावरणामुळे महिलांना पुन्हा कामावर परतण्यास प्रोत्साहन मिळते आणि त्यातून संस्थात्मक कामगिरीही वाढते, यावर चर्चासत्रात विशेष भर देण्यात आला.

मुंबई आणि दिल्ली येथील कार्यक्रम ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आले. सुमारे ५५ मिनिटांच्या पॅनेल चर्चेनंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि निमंत्रित पाहुण्यांशी खुला संवादही साधण्यात आला. यावेळी बोलताना मनीष खांडेवाल म्हणाले, “महिला जाणीवपूर्वक नेतृत्व करतात तेव्हा प्रगतीचा वेग वाढतो. ‘गिव्ह टू गेन’ उपक्रमाद्वारे विविध उद्योग क्षेत्रांतील दृष्टीकोन एकत्र आणून समावेशक नेतृत्व आणि कार्यालयीन रचना संस्थांच्या कार्यक्षमतेला कशी चालना देऊ शकतात यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”

चर्चेच्या सुरुवातीला वक्त्यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासातील प्रेरणा, करिअरमधील महत्त्वाचे टप्पे आणि नेतृत्वशैली घडवताना आलेली आव्हाने याविषयी अनुभव मांडले. त्यानंतर मार्गदर्शन, सहकार्य, व्यावसायिक नेटवर्क आणि ज्ञानाचे आदानप्रदान यांसारख्या संरचित प्रणालींमुळे नेतृत्व क्षमता आणि व्यवसायिक कामगिरी कशी बळकट करता येते यावर चर्चा झाली. मुंबईतील हवार्थ इंडियाच्या पवई येथील शोरूममध्ये आयोजित पॅनेल चर्चेत जैनब मुकादम, कल्पना शंकर तसेच बिलबोर्ड इंडियाच्या मुख्य संपादक वाजपेयी यांनी सहभाग घेतला.

या चर्चेदरम्यान झैनब मुकादम म्हणाल्या, “कार्यालयीन डिझाइन हे सर्जनशीलता आणि नेतृत्व यांच्या संगमावर उभे असते. योग्य डिझाइनमुळे संस्थांमधील लोकांना कामाचा अनुभव कसा मिळतो यावर सकारात्मक प्रभाव पडतो.” तर कल्पना शंकर यांनी सांगितले की, “प्रगती तेव्हाच शक्य होते जेव्हा पुढे जाणाऱ्या महिला इतर महिलांनाही सोबत घेऊन पुढे नेतात.” या चर्चासत्र मालिकेद्वारे कार्यस्थळांमध्ये समावेशकता, नेतृत्व संस्कृती आणि सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *