मुंबई उत्तर मध्यमधून मविआच्या उमेदवार
मुंबई : विद्यमान आमदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतर्फे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या ही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने त्यांची आज उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत हा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्या आला होता. याआधी सुनील दत्त आणि त्यानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त यांनी येथून निवडणूक लढवली होती.
महायुतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. भाजपच्या पुनम महाजन या येथील विद्यमान खासदार असल्या तरी त्यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे येथे भाजपातर्फे उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुती आता कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे आता लक्ष लागलं आहे.
मुंबईतील काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. त्यापैकी
एका जागेवर आज काँग्रेसने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा अद्याप काँग्रेसकडून झालेली नाही. येथून भाजपाने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना तिकीट दिले आहे. येथून भाजपाने दोन वेळा विक्रमी मताने निवडूण आलेल्या गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापले आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र, अखेर वर्षा गायकवाड यांच्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. खरंतर वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र, ती जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होती. तेथे सेनेच्या अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या.
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता उमेदवारी झाल्याने वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे.