रामदास आठवले यांना कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक संपन्न !

मुंबई : (अशोक गायकवाड )—रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्याने त्यांना शुभेच्छा व आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व मंत्री आठवले यांचे आशीर्वाद घेतले . यावेळी झालेल्या बैठकीत १४ एप्रिलला भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २० मार्च महाड येथील ऐतिहासिक सत्याग्रह (क्रांती दिन) तसेच ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिन संदर्भातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी महाड येथे २० मार्च हा दिवस क्रांती दिन तसेच ऐतिहासिक सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० मार्च २०२६ हा ९९ वा क्रांती दिन असल्यामुळे पुढील वर्षी १०० वा शताब्दी ‘क्रांती दिन’ साजरा होणार आहे. या अनुषंगाने महाड येथील क्रांतीभूमी, परिसर व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व सुशोभीकरण करून त्या स्थळाचा राष्ट्रीय स्मारकाच्या धर्तीवर विकास करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री आठवले यांनी सूचना दिल्या. या बैठकीत कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रलंबित कामांचा प्रस्ताव मांडला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका उपाध्यक्ष नितीन मोरे, मुख्य प्रभारी पनवेल महानगरपालिका क्षेत्र, मोहनिष गायकवाड, उपाध्यक्ष पनवेल महानगरपालिका क्षेत्र, प्रभू मधुकर जाधव, पनवेल विधानसभा अध्यक्ष, विजय गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीस उपस्थित राहून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *