कष्टकरी महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाकडून विशेष सन्मान

अनिल ठाणेकर

ठाणे : धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. समाजातील कष्टकरी आणि परिश्रमाने कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त घरकाम करून तसेच विविध प्रकारची मेहनत करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या कष्टकरी महिलांचा विशेष सत्कार धनगर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. समाजातील महिलांनी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पुष्पगुच्छ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील मासुंदा तलाव येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत महिलांसाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणेची आठवण करून दिली. या कार्यक्रमाला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे तसेच सदस्य संगीता खटावकर, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, स्मिता गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमात महिलांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा केला तसेच महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. समाजातील महिलांनी एकमेकांना प्रोत्साहन देत पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *