ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ ‘फटका गँग’चा उच्छाद;
प्रवाशांचे मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद
कल्याण : ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात धावत्या लोकलमधून प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सुमित कमलेश सिंग (वय २७) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली-आडिवली भागातील गावदेवी संकुल येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शैलेश नवले हे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील निक्की नगर येथे राहतात. गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ते त्यांचे मित्र स्वप्निल भूषण यांच्यासह कल्याण रेल्वे स्थानकातून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होते. गाडीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने ते डब्याच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. ही एक्सप्रेस जेव्हा ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली, तेव्हा तिचा वेग मंदावला होता. याच संधीचा फायदा घेत रेल्वे मार्गालगत दबा धरून बसलेल्या सुमित सिंग याने हातात असलेल्या काठीने शैलेश नवले यांच्या हातावर जोराचा फटका मारला.
या अचानक झालेल्या प्रहारामुळे नवले यांच्या हातातील महागडा मोबाईल रेल्वे रुळांवर पडला. एक्सप्रेसचा वेग संथ असला तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवाशांना खाली उतरणे शक्य नव्हते. दरम्यान, आरोपीने रेल्वे रुळांवर पडलेला तो मोबाईल उचलला आणि बाजूला उभ्या असलेल्या एका मेल गाडीच्या खालून पळ काढत कचोरे व खंबाळपाडा दिशेने पळ काढला. नवले यांनी तत्काळ आपल्या पत्नीच्या मोबाईलवरून चोरीला गेलेल्या फोनचे लोकेशन तपासले असता, ते कचोरे मंदिर परिसरात असल्याचे दिसून आले. एक्सप्रेस कळवा रेल्वे स्थानकात पोहोचताच त्यांनी घाईघाईने उतरून पुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची रीतसर तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पथक तयार केले आणि तक्रारदारासह घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी करत असताना पोलिसांना एक संशयास्पद तरुण फिरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीला गेलेला तो मौल्यवान मोबाईल सापडला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या ‘फटका गँग’ने रेल्वे प्रवाशांना अशाच प्रकारे इतर ठिकाणीही लुटले आहे का, याचा सखोल तपास सुरू केला आहे.
