बेपत्ता ओला चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

कल्याण : चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या ओला चालकाचा मृत्यूदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्याची ओला कार कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवेलीच्या जंगलात आढळून आली. या घटनेचा ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (राहणार टिटवाळा) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर नासिर अहमद असं मृतदेह आढळून आलेल्या कार चालकाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नासिर अहमद हा नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. गेल्या चार दिवसापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल होती. याच घटनेचा पोलीस तपास सुरू असताना शनिवारी निसारचा मृतदेह माळशेज घाटावरील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना आढळून आला. तर त्याची ओला कार कल्याण – मुरबाड मार्गावरील गोवेली गावच्या हद्दीतील जंगलात आढळून आली. या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसले आहेत.

या घटनेचा तपास ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी पथकासह सुरू केला. यावेळी निसारचा मृतदेह ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आला. यानंतर तपासाची चक्रं वेगानं फिरवत आरोपी आदर्श भालेराव याला टिटवाळ्यातून गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून अद्यापपर्यंत ओला चालक नासिर अहमदची हत्या ही कुठल्या कारणामुळे झाली याचं ठोस कारण उघड झालं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *