रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम आयोजित१०, ५ व ३ किमीच्या “रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेस” महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सुमारे साडेसातशे महिलांनी या रणरागिणी स्पर्धेत सहभाग घेत रणरागिणी हे नाव सार्थ ठरविले. इतकेच नव्हे तर बेस्ट थीम या कॅटेगरीअंतर्गत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन महिलांनी शिक्षणाचा, समतेचा संदेशही या स्पर्धेमार्फत जनमानसापर्यंत पोहोचविला. या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील महिला या प्रेरणास्त्रोत आहेत तसेच प्रत्येकासाठी मदतीचा स्त्रोतही आहेत, आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात महिला हाच मोठा आधारस्तंभ आहेत असे संबोधत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी वैष्णवी मॅटर्निटी होमचे डॉ. अश्विन कक्कर, ट्रायमॅटिक्स संस्थेच्या डॉ .शोभा पाटील, स्पर्धेचे सर्व प्रायोजक ,सर्व सहभागी महिला यांचे अभिनंदन केले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत )प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली  महापालिकेच्या विद्युत विभागाने उभारलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृती कक्षास महापौर हर्षाली चौधरी व आयुक्त अभिनव गोयल यांनी भेट देऊन प्रशंसा केली आणि ऊर्जा संवर्धनाची अशी जनजागृती सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *