छ. संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतानच आज माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी पक्षाच्या प्रातिनिधिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदेंसोबत आलेल्यांना लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं, पण भाजपमुळे तसं झालं नाही, मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप नवले यांनी यावेळी केला.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते यांच्या मनातील खदखदीला मी वाट मोकळी करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आले, त्यांना उमेदवारी देणं अपेक्षित होतं. कृपाल तुमानी, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी गेला. कदाचित हेमंत गोडसे यांचा देखील बळी जाण्याची शक्यता आहे. हे चित्र कशाचं प्रतिक आहे? असा सवाल नवले यांनी यावेळी केला.
शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप सत्तेची फळ चाखत आहे. शिंदेनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपला बसता आलं. नाही तर भाजपला रस्त्यावरती मोर्चे काढावे लागले असते, असेही नवले यावेळी म्हणाले.
मी प्रभू रामचंद्राला साकडं घालतो, भाजपापासून मुख्यमंत्र्यांचे संरक्षण झालं पाहिजे, तरच शिवसेनेला भवितव्य आहे. जर भाजपाच्या दबावाखाली शिवसेना अशीच वागत राहिली तर प्रभुरामचंद्र या पक्षाला वाचवो असंही नवले म्हणाले.