वसई : आंतरराष्ट्रीय महिला दिनी अवघं जग स्त्रिशक्तीचा जयजयकार करीत असताना वसईत आक्रीत घडले. वसई पूर्व परिसरात नवजात बालिकेला रस्त्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास वसई पूर्व येथील वसंतनगरी सिग्नल परिसरात एका हिरव्या रंगाच्या वॉशिंग पावडरच्या पिशवीत नवजात बालिका आढळून आली. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
डॉक्टरांकडून बालिकेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
माहिती मिळताच पोलीस आपत्कालीन वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती. स्थानिकांकडे चौकशी केली असता त्या बालिकेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी तातडीने बालिकेला ताब्यात घेऊन उपचारासाठी वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून बालिकेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेला रस्त्यावर सोडून दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
