मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे माध्यमविश्वात मोठे परिवर्तन घडत आहे. पत्रकारिता, कथाकथन आणि चित्रपट निर्मिती यामध्ये एआय च्या वाढत्या वापराचा वेध घेण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘एआय परिषद २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हा विशेष कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात येणार आहे. ‘भविष्याच्या माध्यमजगतात एआय ची नवी दिशा’ या विषयावर ही परिषद होणार असून पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स, फिल्ममेकर आणि डिजिटल माध्यमांमध्ये काम करणार्यांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.
या परिषदेचे उदघाटन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग (आयपीएस) यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार आणि माहिती तंत्रज्ञान विषयक लेखक माधव शिरवळकर, एआय कम्युनिटी बिल्डर आणि एआय फेस्टिव्हल आयोजक अनुराग तिवारी, अनुभवी फोटो जर्नलिस्ट व पुरस्कारप्राप्त एआय फिल्ममेकर प्रसाद गोरी, पुरस्कारप्राप्त एआय फिल्ममेकर व स्टोरीटेलर सागर चोगले, प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर व एआय अॅड मेकर प्रियंकु सरमा, तसेच एआय एज्युकेटर आणि डिजिटल स्टोरीटेलर अशोक रेड्डी हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत., अशी माहिती अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
परिषदेत एआय फिल्ममेकिंगचे लाईव्ह डेमो, एआय स्टोरीटेलिंग, डिजिटल कंटेंट क्रिएशनमध्ये एआय चा वापर, पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रातील एआय, एआय आधारित चित्र व व्हिडिओ निर्मिती, सोशल मीडिया कंटेंट, भारतीय भाषा आणि एआय, एआय मधील नवे ट्रेंड, क्रिएटिव्हिटी व कल्पनाशक्ती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय एआय तज्ज्ञांसोबत थेट संवाद, नेटवर्किंगची संधी आणि खुल्या प्रश्नोत्तरांचे सत्रही आयोजित करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे समन्वयक राजेश खाडे (९८१९८४५५६६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.
एआय च्या बदलत्या युगात माध्यम क्षेत्रातील व्यावसायिकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्याचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
टीप : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी क्युआरकोड वा लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
