पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक
कल्याण: एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले असून संघाची अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत पोटावाड याने प्रतिनिधित्व केले. अनिकेतने संघासाठी उत्कृष्ट खेळ करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
मुंबई विद्यापीठाच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट रणनीती, संयम आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे संघाला पश्चिम विभागातील बलाढ्य विद्यापीठांमध्ये आपले स्थान सिद्ध करता आले. या कामगिरीमुळे आता मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार असून देशभरातील विविध विद्यापीठांशी सामना करणार आहे. या संघासाठी मार्गदर्शक म्हणून अमित भोजने आणि मार्गदर्शक म्हणून उमेश सोनवणे यांची निवड झालेली आहे.
अनिकेत पोटावाडच्या या उल्लेखनीय यशाबद्दल एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि क्रीडा विभागाने त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
