उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या
शरीरावर जवळपास ३२ हून अधिक वार
उल्हासनगर दि ९ ( सुनिल इंगळे ) : उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नशेखोर तरुणाने ऑन ड्युटी सफाई कामगारावर धारदार चाकूने जवळपास ३२ हून अधिक त्याच्या शरीरावर वार करून त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची खळबजनक घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे
मिळालेल्या माहितीनुसार चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेल्या त्या सफाई कामगाराचे नाव महादू उर्फ महादेव जगताप (३५) असे आहे. तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक मधील शहाड गावठाण परिसरात राहत होता. महादू हा कोणार्क ग्रीन एन्व्हायरो या कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी तो शहरातील पॅनल क्रमांक ११ मध्ये बॅरेग क्रमांक ८९६, माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर त्या ठिकाणी लोकांच्या घरातून कचरा डब्यामध्ये टाकण्याचे काम करीत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या ठिकाणी एका नशेखोर तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून महादू याच्याशी भांडण काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या तरुणाने त्याच्या जवळील धारदार चाकूने महादू जगताप यांच्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक चाकूचे सपासप वार केले. महादू हा रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडला. हा प्रकार घडून येतात त्या तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून डांबून ठेवले. या घटनेची खबर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
जखमी महादू जगताप याला त्वरित उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी त्या तरुणाला महादू जगताप यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एकच संतापाचे वातावरण पसरले असून त्यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन त्या ठिकाणी गर्दी केली होती.
ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या हत्याची थरारक दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी या घटने प्रकरणी तपास सुरू केला असून ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव दुर्गेश गुप्त असल्याचे सांगितले आहे. कोणार्क कंपनीच्या सफाई कामगारांनी या घटनेचा निषेध केला. नशेखोर तरुणाकडून हा हात्याचा प्रकार घडून आल्याने शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कोण पुरवणार. निर्घृण हत्या करण्यात आलेल्या महादू जगताप याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्याला दोन लहान मुले आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत लढा संघटनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले महानगरपालिकेने व कोणार्क कंपनीच्या प्रशासनाने महादू जगताप यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्याच्या मुलांच्या भवितव्याचे तजबीज करता येईल, त्याच्या कुटुंबाला आधार होईल आणि ज्या आरोपीने हे कृत्य केले या घटनेच्या निषेधार्थ उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्या तरुणाने महादू जगताप यांच्यावर इतक्या भयानक प्रमाणे चाकूने सपासप वार का केले. याचीही माहिती पोलीस काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील मोकाट फिरणाऱ्या नशेखोर व गांजाडी तरुणाविरुद्ध पोलिसांनी त्वरित काहीतरी उपयोजना करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
