धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न
दिवा: धर्मराज फाउंडेशनच्या वतीने निळजे लोढा पलावा येथे आयोजित करण्यात आलेला ‘निळजे लोढा पलावा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, निळजे येथे २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात उदघाटन समारंभासह सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीतांचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, ब्युटी मेकअप स्पर्धा, फॅशन शो तसेच महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडले.
विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन व खेळ पैठणी यांसारख्या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच “एक शाम बुजुर्गों के नाम” या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र धर्मराज पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य, महिला कमिटी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महोत्सवामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर, सहकारी व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
