नवी मुंबई महानगरपालिका चषक

४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबई : ४० वर्षावरील क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत त्यांच्या मनात असलेली आरोग्य जागरुकता वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकांतर्गत मागील १० वर्षापासून ४० वर्षावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा जाहीर होऊन अलपकालावधी उपलब्ध होऊनही या स्पर्धेला मिळलेला भरघोस प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे मत महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती  गिरीष म्हात्रे यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयाजवळील क्रीडांगणात २३, २४ व २५ मार्च २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक ४०वर्षावरील क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. या प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ४० वर्षावरील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदिप पाटील, उपाध्यक्ष  नरेश गौरी, सचिव  एल डी पाटील व विकास मोकल, मनोज म्हात्रे, बळीराम पाटील, भालचंद्र दळवी, बाळकृष्ण बंदरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील ३३ क्रिकेट संघ तसेच शहरी भागातील २५ क्रिकेट संघ असे एकूण ५८ क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. यावेळी पावणेगाव व ऐरोलीगाव या संघांमध्ये झालेल्या शुभारंभाच्या सामन्यात पावणेगाव संघाने विजय संपादन केला. या स्पर्धतील ग्रामीण क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक तसेच शहरी भागातील क्रिकेट संघांसाठी स्वतंत्र विजेता व उपविजेता चषक असणार आहे.  वैयक्तिक कामगिरी करणा-या सर्वोतम खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील दोन स्वतंत्र स्पर्धांच्या अंतिम फेरीचे सामने सेक्टर ३ सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकूलात संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे हे सामने क्रीडा संकुलात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रखर विद्युत व्यवस्थेत प्रकाशझोतात संपन्न होणार आहेत.

तरी क्रिकेटप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून चाळीशीनंतर आपले आरोग्य जपणा-या ४० प्लस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *