आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा

केडीए, रहेजा, केईएम हॉस्पिटल उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल-अंधेरी, रहेजा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. अर्धशतकवीर संकेत किणी ( ४३ चेंडूत ५४ धावा) व दिशांत म्हात्रे (२८ चेंडूत ३५ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने उभारलेले १५१ धावांचे आव्हान किम्स हॉस्पिटलला २३ धावांच्या फरकाने पेलवले नाही. सलामीवीर डॉ.रौठू राकेशकुमार (२० चेंडूत २३ धावा) व डॉ. परमेश्वर मुंडे (११ चेंडूत नाबाद १५ धावा) यांनी किम्स हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू डॉ. राकेशकुमार व संकेत किणी यांना पुरस्कार देऊन क्रिकेटपटू धनंजय केतकर, डॉ. विवेक पालकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.

शिवाजी पार्क येथील दुसऱ्या अतिशय चुरशीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सलामीवीर भूषण सावंत (२० चेंडूत २५ धावा) व विजय वैती (३३ चेंडूत ४६ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलने सर्वबाद १३१ धावसंख्या रचली. बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना १४ धावा कमी पडल्या. सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव (३१ चेंडूत ३५ धावा) व अष्टपैलू डॉ. मनोज यादव (९ धावांत ५ बळी) यांनी छान खेळ केला. केईएम हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १२१ धावांचा टप्पा गाठताना प्रीतेश सावंत (३९ चेंडूत ४३ धावा) व सागर सोळंकी (२८ चेंडूत ३१ धावा) यांनी चमकदार फलंदाजी केली. सलामीवीर कल्पेश भोसलेच्या (३३ चेंडूत ४७ धावा) धडाकेबाज फलंदाजीमुळे डावाच्या मध्यास ४ बाद ८१ धावांची सुस्थिती कस्तुरबा हॉस्पिटलकडे होती. परंतु जयदीप मेहेर (२७ धावांत ३ बळी) व प्रीतेश सावंत (१५ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला १५.४ षटकात ९७ धावांत गुंडाळले आणि केईएम हॉस्पिटलने २४ धावांनी शानदार विजय संपादन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *