हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. हवा प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन पालिकांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांना नोटीसा बजावून धुळ प्रदुषण रोखण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली होती. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून त्याद्वारे प्रदुषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्याने धुण्यात येत होते. याशिवाय, सर्वंकष स्वच्छता मोहिम शहरात राबविण्यात येत होती. यामध्ये रस्ते आणि गल्लीबोळात साफसफाई केली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसांपुर्वी दिसून आले होते. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १३० पर्यंत आले होते. यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती. त्यापाठोपाठ आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *