रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
मुंबईचा विजय लांबला
चौथ्या दिवशी विदर्भाची कडवी झुंज
मुंबई : रणजीच्या अंतिम फेरीत मुंबईचा संघ चौथ्या दिवशी विजय मिळवेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण विदर्भाच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत मुंबईचा विजय लांबणीवर नेलाय. विदर्भाच्या करुण नायरने मुंबईच्या गोलंदाजांसामोर कडवी झुंज दिली आणि मुंबईला चौथ्या दिवशी विजयापासून दूर लोटले. चौथ्या दिवसअखेर विदर्भाने ५ बाद २४८ अशी मजल मारली आहे. पण तरीही मुंबईच्या संघाकडे अजूनही २९० धावांची आघाडी आहे. त्यामुळे आज पाचव्या दिवशी मुंबईचा संघ विजय मिळवू शकतो असं बोललं जातंय.
विदर्भाच्या संघाने बिनबाद १० या धावसंख्येवरून चौथ्या दिवशी सुरुवात केली. विदर्भाच्या संघाने यावेळी ६४ धावांची सलामी दिली. पण यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विदर्भाच्या दोन खेळाडूंना बाद केलं. परिस्थिती बघता मुंबईच्या संघाला या सामन्यात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती. पण अशा वेळी मुंबईच्या गोलंदाजांपुढे समर्थपणे उभा राहीला तो करुण नायर. करुणने आतापर्यंत स्थानिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण पहिल्या डावाच तो मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला होता. पण यावेळी करुण खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. करुणने यावेळी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगला सामना केला आणि मुंबईचे चौथ्या दिवशी विजय मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.करुणने यावेळी तब्बल २२० धावांचा सामना केला. या २२० धावांचा सामना करताना करुणने फक्त तीन चौकार लगावले. करुणला यावेळी मुशीर खानने बाद करत मुंबईच्या संघाला मोठे यश मिळवून दिले. करुणने यावेळी ७४ धावा केल्या असल्या तरी त्याने जवळपास दोन सत्र खेळून काढली आणि त्यामुळे मुंबईला चौथ्या दिवशी विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी मुंबईचा संघ विजय मिळवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.