संमती, न्याय आणि समतोल तपासाची गरज
राष्ट्रीय पुरुष आयोगाची भूमिका स्पष्ट
रमेश औताडे
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरुष आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात कुठलीही तडजोड होऊ शकत नाही; मात्र कोणत्याही व्यक्तीवर आरोप करताना पुरावे आणि तपास यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.
संमती आणि जबरदस्ती यामध्ये स्पष्ट फरक आहे. न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांमध्येही परस्पर संमतीने घडलेल्या संबंधांना वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सर्व बाजू ऐकून, पुराव्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावेत, असे आयोगाने म्हटले आहे.
आयोगाने हेही स्पष्ट केले की, महिलांवर होणारे अत्याचार ही गंभीर बाब आहे आणि अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्याचबरोबर, कोणत्याही व्यक्तीवर खोटे आरोप होणार नाहीत याची काळजी घेणेही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. समाजात दोन्ही बाजूंचा विश्वास टिकून राहण्यासाठी समतोल दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात संबंधित व्यक्तींना न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे असे आयोगाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी सांगितले.
