फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर
४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देणार
राजेंद्र साळसकर
पुणे – सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण देणारी देशातील पहिली शैक्षणिक संस्था फ्युएलचा आयपीओ एनएसईच्या सोशल स्टॉक मार्केटमध्ये येणार आहे. सोमवार, ३० मार्चला दुपारी ३ वा. मुंबई येथील एनएसई अॅट्रियम, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे या आयपीओचा बेल रिंगिग समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे कौशल्य विकास व उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती फ्यूल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी दिली. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की, संस्थेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेमुळे आयपीओला चांगला प्रतिसाद मिळेल.
डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, अत्यंत काटेकोर निकषातून निवड झालेल्या ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेनचा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी आयपीओ काढण्यात येणार आहे. या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा मानस आहे. सोशल आयपीओच्या संकल्पनेनुसार हा आयपीओ घेणार्या भागधारकांना कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक लाभ मिळत नाही. मात्र, सोशल आयपीओमध्ये येणार्या संस्थांची कार्यक्षमता, उद्दिष्ट आणि फलित, विश्वासार्हता याची काटेकोर छाननी करण्यात येणार आहे. या मुळे सामाजिक कार्यासाठी देत असलेल्या निधी योग्य ठिकाणी गेल्याची खात्री आणि समाधान भागधारकांना मिळेल.
सामाजिक भरीव कार्य करणार्या संस्थांना निधी उपलब्ध व्हावा आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा निधी योग्य ठिकाणी पोहोचावा या उद्देशाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात ही योजना मांडली. सध्या ७० सामाजिक संस्था सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत आहेत. डॉ. देशपांडे यांनी सर्व संस्थांना आवाहन केले की, सामाजिक कार्य करणार्या ना नफा ना तोटा या तत्वावरील संस्थांनी सोशल आयपीओमध्ये भाग घ्यावा
