टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या
उल्हासनगर – ओमी कलानी यांनी महायुतीतील कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. दोस्तीच्या या पाठिंब्यामुळे शिवसेना वगळून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, उल्हासनगरातील टीम ओमी कलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची स्टिकर्स झळकली आहेत. या स्टिकर्सचे अनावरण करतानाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याची प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तीन चार दिवसांपूर्वी कलानी महलवर झालेल्या टीम ओमी कलानीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दोस्तीच्या भावनेतून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या कलानी परिवाराने डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. तेंव्हा ओमी कलानी हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असल्याची शाबासकी डॉ. शिंदे यांनी दिली होती.याच मेळाव्यात डम्पिंग ग्राउंड, भूमिगत वाहनतळ, दफनभूमी, धोकादायक इमारत, उत्तर भारतीय भवन, म्हारळ गाव ते वडोल गाव उन्नत महामार्ग अश्या सहा समस्या सोडविण्या संबंधी गॅरंटीची मागणी टीओकेकडून मनोज लासी यांनी केली.
पेट्रोल पंपावर बॅनर लावून जे गॅरंटी देतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास फक्त खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याची टिका मोदी यांचे नाव न घेता टीका टीओके प्रवक्ता कमलेश निकम यांनी केली होती. याबाबतची नाराजी महायुतीतील भाजप, रिपाई आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी व्यक्त करीत महायुतीच्या जव्हार हॉटेल येथे पार पडलेल्या समन्वय बैठकीत टिओकेचा बॉयकॉट केला होता. यावरून मास मीडियावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी आमनेसामने आले होते.
दरम्यान टीओकेच्या मेळाव्याला काही दिवस झाले असतानाच टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची 5 हजार स्टिकर्स झळकली आहेत. कारच्या मागील काचेवर ही स्टिकर्स चिकटवण्यात येणार आहेत. त्यावर डॉ. श्रीकांत शिंदे,ओमी कलानी या दोघांची फोटो असून धनुष्यबाण ही निशाणी दिसत आहे.
डॉ. शिंदे यांनी या स्टिकर्सचे अनावरण त्यांच्या डोंबिवली निवासस्थाना समोर केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, नरेंद्रकुमारी ठाकूर, अजित माखिजानी, संतोष पांडे, अवि पंजाबी, सुंदर मुदलियार आदी उपस्थित होते.
