डोंगरी महोत्सवात उजळला ‘महाराष्ट्र तेजोत्सव’!
दौलतनगरात प्रकाश, परंपरा आणि पर्यटनाचा जल्लोष
पाटण (प्रतिनिधी) – तालुक्यातील दौलतनगर येथे रंगलेल्या डोंगरी महोत्सवात ‘महाराष्ट्र तेजोत्सव’ने अक्षरशः उजेडाची आणि उत्साहाची व संगीताची बरसात झाली. डोंगररांगांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने स्थानिकांसह पर्यटकांनाही मंत्रमुग्ध केले.
या महाराष्ट्र तेजस्वी उत्सवाचे उद्घाटन पर्यटनमंत्री मा ना शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. आय रियालिटीज आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक रोषणाईची झळाळी दिली.
पर्यटनावर आधारित गाण्याचा जल्लोष
उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या पर्यटनावर आधारित खास गाण्याचे लोकार्पण यावेळी माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या गाण्याचे लेखन सुप्रसिद्ध गीतकार सौ वर्षा राजेंद्र हुंजे मुंबई यांनी केले आहे, तर त्याचे संगीत निनाद सोलापूरकर यांनी दिले आहे. याच गाण्यावर सादर झालेल्या लाईट आणि साऊंड शोने प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. रंग, प्रकाश आणि सुरांच्या संगमाने दौलतनगरची रात्र अविस्मरणीय बनली.
परंपरेचा भव्य आविष्कार
या तेजोत्सवात ४० फुटांचे मावळे, वारली कलेच्या विविध छटा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेली वारकरी परंपरा हे प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राच्या मातीतली ओळख जिवंत झाली.
राज्यभर तेजोत्सवाची घोषणा
यावेळी बोलताना मंत्री श्री शंभुराजे देसाई यांनी ‘महाराष्ट्र तेजोत्सव’ राज्यातील विविध भागांत आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे पर्यटनाला चालना मिळून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अधिक व्यापक प्रचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दौलतनगर बनले संस्कृतीचे केंद्रबिंदू
या भव्य सोहळ्यामुळे दौलतनगर हे केवळ एक गाव न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यटन नकाशावर उजळून निघाले आहे. डोंगरी महोत्सवातील हा तेजोत्सव आगामी काळात राज्यातील सांस्कृतिक उत्सवांसाठी एक नवा मापदंड ठरणार, यात शंका नाही.
कोट
महाराष्ट्र तेजोत्सव सादर करताना महाराष्ट्राचे पर्यटन नजरेसमोर ठेवून त्याची आखणी करण्यात आली. याला नागरिकांसमोर मांडण्याची संधी पर्यटन विभागाने दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे हे वैभव अधिक उजळपणे मांडण्याची संधी मिळेल.
– प्रसाद आजगावकर, सीईओ, आय रियालिटी
