मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यातील हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे.
राज्य सरकार हिवतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला मागील काही वर्षांपासून यश मिळताना दिसत आहे. यामुळे हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यात २०२१ मध्ये हिवतापाने १४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२२ मध्ये हिवतापामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली. यात २०२३ मध्ये घट होऊन ती १९ वर आली. २०२४ मध्ये आतापर्यंत हिवतापाचे २ हजार ६५० रुग्ण सापडले असून, एकाही मृत्यू दगावलेला नाही.
ॲनोफिलिस डासामुळे हिवतापाचा प्रसार
ॲनोफिलिस डास चावल्याने हिवतापाचा प्रादुर्भाव होतो. हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून सोसायटी व इमारतीमधील पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये जागरूकता करण्यात येत आहे.